रस्त्याने घरी जाताना बिबट्याचा हल्ला; हल्यात कळस येथील एकजण ठार
1 min read
कळस दि.३:- पारनेर तालुक्यातील कळस येथे मंगळवारी (दि.२) रात्री सात वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात गणेश तुळशीराम गाडगे (वय ४०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गावापासून दीड किलोमीटर अंतरावरील रानमळा रस्त्याला सुतार वस्तीजवळ घडली. गणेश हे कळस गावाकडून रानमळ्याच्या रस्त्याने घरी येत असताना बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. रात्री आठ वाजेपर्यंत गणेश घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता हा प्रकार उघडकीस आला.स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने गणेश गाडगे यांना टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
कळस परिसरात उसाचे प्रमाण जास्त असल्याने बिबट्यांचा वावर नेहमीच असतो. यापूर्वीही जनावरांवर बिबट्यांचे हल्ले झाले आहेत, परंतु मानवी जीवितहानीची ही पहिलीच घटना आहे. या हल्ल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिकांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.