मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग, अटल सेतूवर ‘या’ वाहनांना संपूर्ण टोलमाफी; राज्य सरकारचा मोठा निर्णय
1 min read
मुंबई दि.३:- राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले असून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या सर्व ई-वाहनांना आता संपूर्ण टोलमाफी मिळणार आहे. या निर्णयामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील हजारो ई-वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.राज्य सरकारने 2021 मध्ये ‘इलेक्ट्रिक वाहन धोरण’ जाहीर केले होते. त्याअंतर्गत नागरिकांना ई-वाहन खरेदीसाठी प्रोत्साहन देण्यात आले. केंद्र सरकारने ‘फेम योजना’ राबवून ई-वाहन उत्पादन आणि वापराला चालना दिली.
पुणेकरांनी या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. परिणामी, शहरात ई-वाहनांची संख्या झपाट्याने वाढून ती एक लाखांच्या पुढे पोहोचली. मात्र, केंद्र सरकारने अलीकडेच अनुदानात कपात केल्याने ई-वाहन खरेदीचा वेग कमी झाला. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने धोरणांतर्गत टोलमाफीचा निर्णय जाहीर केला आहे.
सरकारच्या आदेशानुसार वरील तीन प्रमुख मार्गांवरून प्रवास करताना कोणत्याही प्रकारच्या ई-वाहनांना पथकर भरावा लागणार नाही. यामुळे वाहनचालकांचा प्रवास खर्च लक्षणीय प्रमाणात कमी होणार आहे. तसेच, पारंपरिक इंधनाच्या वापरात घट होऊन
पर्यावरण संवर्धनासही हातभार लागेल. परिवहन विभागाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित महामार्ग प्राधिकरणांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.