राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची जोरदार तयारी; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकणार

1 min read

नाशिक दि.२:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर १४ व १५ सप्टेंबर रोजी शरद पवार दोन दिवसांच्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर राहणार आहेत. यामध्ये पक्षाचं विशेष कार्यकर्ता शिबिर, तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भव्य शेतकरी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.१४ सप्टेंबरला नाशिक शहरात पक्षाचं विशेष कार्यकर्ता शिबिर होणार असून, या शिबिरात पक्ष संघटना बळकट करण्यासोबतच आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखली जाणार आहे. या शिबिरात शरद पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिबिराच्या माध्यमातून पक्षाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. १५ सप्टेंबर रोजी नाशिक शहरात भव्य शेतकरी महामोर्चा काढण्यात येणार आहे. कर्जमाफी, हमीभाव, कांदा दराचा प्रश्न, पीक विमा, ऊस उत्पादकांचे प्रश्न, अवकाळी पाऊस, ओला दुष्काळ, तसेच शेतकऱ्यांवर लादले जाणारे निर्बंध, अशा ज्वलंत प्रश्नांवर सरकारला जाब विचारणारा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न थेट सरकारपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या महामोर्चात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राज्यातील आणि देशातील विविध नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी होणार आहेत.या आंदोलनाची सुरुवात नाशिक येथून होत असली, तरी ही लढाई पुढे जिल्हा, तालुका आणि शहर पातळीवर नेण्यात येणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडली असून, त्यात पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरायचे धोरण ठरवण्यात आले आहे. शिंदे यांनी पुढे सांगितले की, शेतकऱ्यांच्या उत्पादनांना हमीभाव मिळत नाही, सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा कमी दराने कांदा, तूर, मूग यांची खरेदी होत आहे. सरकारने हमीभावानुसार तत्काळ खरेदी सुरू करावी, तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. शरद पवारांच्या या दोन दिवसीय दौऱ्यामुळे नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आघाडीवर राहण्यासाठी सज्ज झाली असून, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये तयारीला वेग आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!