बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी; तरुणाची ३ मिनिट बिबट्यासोबत झटापट

1 min read

संगमनेर दि.८:- दाढ खुर्द (ता. संगमनेर) शिवारातील हनुमानवाडी परिसरात राहत असलेल्या ज्ञानेश्वर अंत्रे (वय 35) या तरुणावर बुधवार (दिनांक ७) पहाटे बिबट्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात हा तरुण जखमी झाला. या तरुणाने जीव वाचवण्यासाठी ३ मिनिट बिबट्या सोबत झटापट केली.याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर अंत्रे हा तरुण पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास शेतात उभारलेल्या गोठ्यात स्वच्छता करत होता.

या वेळी शेणाची टोकर टाकण्यासाठी गोठ्यापासून थोड्या अंतरावर चालला असताना शिकारीच्या शोधात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.या प्रसंगी ज्ञानेश्वर याने प्रसंगावधान दाखवत मोठ्याने आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने तेथून पलायन केले. मात्र, यापूर्वी बिबट्या व ज्ञानेश्वर यांच्यात दोन ते तीन मिनिटे जोरदार झुंज झाल्यामुळे ज्ञानेश्वर यांच्या हातावर व डोक्याला जखमा झाल्यामुळे रक्तस्राव झाला.

त्यामुळे त्याला प्राथमिक उपचारासाठी लोणी व पुढील उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच दाढचे सरपंच सतीश जोशी घटनास्थळी दाखल झाले.

या वेळी त्यांनी योग्य ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी सरपंच जोशी, नितीन पाबळे आदींनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे