हवामान विभागाचा अंदाज 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान मोठा पाऊस
1 min read
पुणे दि.२८:- गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) यासंदर्भात मोठा इशारा जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
राज्यातील मराठवाडा, कोकण आणि विदर्भ या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.या काळात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सिंधुदुर्ग, जालना, परभणी, नांदेड, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रासोबतच छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, गोवा आणि ओडिशासारख्या सात राज्यांमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकमध्येही पावसाचे प्रमाण वाढणार असून उद्या आणि परवासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 98 टक्के भरले असून
जिल्ह्यातली 12 धरणे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सुरू झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, रब्बी पिकांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच, नागरिकांना उकाड्यापासूनही दिलासा मिळाला आहे.
