राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय व श्रीनिवास विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार
1 min read
कर्जुले हर्या दि.२५:- मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान संचलित राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, कर्जुले हर्या, (ता. पारनेर) आणि श्रीनिवास विद्यापीठ, मुका, मंगळुरू, भारत यांच्यात शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) नुकताच करण्यात आला.

या MoU मुळे महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांना संयुक्त संशोधन प्रकल्प, शैक्षणिक व सांस्कृतिक देवाणघेवाण, तांत्रिक कार्यशाळा, औद्योगिक प्रशिक्षण, इंटर्नशिप, तसेच उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. विशेषत: ग्रामीण व अर्धशहरी भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक आणि संशोधन सुविधांचा लाभ घेता येणार असून त्यांची स्पर्धात्मकता वाढणार आहे.

यावेळी दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींनी या उपक्रमामुळे अभियांत्रिकी, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात नवोन्मेष, उद्योजकता, स्टार्टअप संस्कृती आणि उद्योग-शिक्षण सहयोगाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार असून त्याचा थेट फायदा त्यांच्या करिअर व रोजगारक्षमतेस होईल, असेही नमूद करण्यात आले.

या सामंजस्य करारामुळे राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याला नवे परिमाण मिळेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाशी जोडून त्यांचा सर्वांगीण शैक्षणिक, संशोधनात्मक व व्यावसायिक विकास साधणे हा यामागचा उद्देश असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा मिरा आहेर, सचिव किरण आहेर, कार्याध्यक्ष डॉ. दिपक आहेर, संचालिका डॉ. श्वेताम्बरी आहेर,शितल आहेर, खजिनदार बाळासाहेब उंडे व प्राचार्य डॉ. कृपाल पवार यांनी स्पष्ट केले.

