जुन्नर बाजार समितीच्या जमीन खरेदी व्यवहार रद्दसाठी भव्य निषेध मोर्चा

1 min read

जुन्नर दि.२२:- कृषी उत्पन्न बाजार समिती, जुन्नर यांनी वारूळवाडी येथे सुमारे दहा एकर जमिनीची चुकीच्या पद्धतीने व बाजारभावापेक्षा जादा दराने खरेदी केल्याचा गंभीर आरोप उभा राहिला आहे. या कथित गैरव्यवहाराचा निषेध करून खरेदी व्यवहार तात्काळ रद्द करावा, जबाबदार अधिकार्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी गुरुवार (दि. २१) तालुक्यातील शेतकरी बांधवांनी जुन्नर बाजार समितीच्या मुख्य कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या गेटला कुलूप ठोकत घोषणाबाजी करून तीव्र संताप व्यक्त केला.मोर्चेकऱ्यांच्या वतीने तहसीलदार डॉ. सुनील शेळके तसेच सहाय्यक निबंधक गजेंद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर जमिनीच्या खरेदी व्यवहारातील सर्व हरकतींवर पुन्हा चौकशी व्हावी.सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, जुत्रर यांनी दिलेला चुकीचा अहवाल तपासून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक करून चुकीच्या पद्धतीने खरेदीखत नोंदविण्यात आले. त्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीस जबाबदार धरून संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावे. जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहील,तसेच आवश्यकता भासल्यास आमरण उपोषण पुकारले जाईल असा आंदोलकांनी पवित्रा घेतला.या निषेध मोर्चात तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी बांधव, महिला, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रमुख उपस्थितांमध्ये बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, संतोष चव्हाण, भास्कर गाडगे, प्रियंका शेळके, भाजपा नेत्या आशा बुचके, संतोष खैरे, सचिन वाळुंज, बाबू पाटे, तानाजी तांबे, धनराज खोत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर, नेताजी डोके, सुशांत दरेकर, रघुनाथ लेंडे, प्रसन्न डोके, रामभाऊ वाळुंज, बाबा परदेशी, अमोल भुजबळ, सावकार पिंगट,दिगंबर घोडेकर,जालिंदर बांगर आदींसह शेकडो शेतकरी सहभागी झाले.मोर्चादरम्यान उपस्थित असलेल्या बाजार समितीच्या संचालक मंडळातील माऊली खंडागळे, संतोष चव्हाण व भास्कर गाडगे या तिघांनी आमच्याबाबत जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचे प्रयत्न होत आहेत. आम्ही कोणाच्याही घरी कोणत्याही कारणाने गेलो नसल्याचे जाहीरपणे सांगतो आणि त्यावर आम्ही शपथ घेतो, असा खुलासा करीत स्वतः वरील आरोप फेटाळले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!