लाथ घालणाऱ्या त्या पोलिस अधिकाऱ्याविरोधात बडगा
1 min read
जालना दि.२२:- जालना येथे उपोषणकर्त्यासोबत
पोलिसांनी केलेल्या वर्तनाची राज्य मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती ए. एम. बदर यांनी आयोगातर्फे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि जालना जिल्हा पोलिस अधीक्षकांना नोटीस बजावली आहे.
वंचित बहुजन आघाडीने याबाबत मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती.कार्यकर्ते उपोषण करत असताना मंत्री पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी अमित!चौधरी व गोपाल चौधरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, जालना उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या
या कार्यकर्त्यांना पाठीमागून लाथ घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची छायाचित्रेही आयोगाकडे सादर करण्यात आली आहेत.संबंधित पोलिस अधिकाऱ्याचे हे वर्तन वसाहतकालीन दृष्टिकोन दर्शवणारे असून,भारताच्या राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारे आहे, असे निरीक्षण आयोगाने नोंदवले आहे.
गृह विभाग आणि जालना पोलिस अधीक्षक यांनी या तक्रारीवर आपले म्हणणे नोंदवावे. पीडितांना नुकसानभरपाई का दिली जाऊ नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. त्याचबरोबर संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर फौजदारी खटला दाखल करणे
आणि विभागीय चौकशी सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या प्रकरणी प्राथमिक तथ्य शोथ तपास करून चार आठवड्यांच्याआत अहवाल सादर करण्याचे आदेश जालनाच्या पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहेत, अशी माहिती आयोगाचे प्रबंधक विजय केदार यांनी दिली.
या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी होईल. या प्रकरणाचा अहवाल विहित मुदतीत न आल्यास आयोग या तक्रारीवर एकतर्फी निर्णय घेईल, असे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
