चीजसदृश्य पदार्थाची विक्री;अन्न औषध विभागाची कारवाई
1 min read
अहिल्यानगर दि.२१:- चीजच्या नावाखाली बनावट चीजसदृश्य पदार्थ विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने नामांकित कंपनीस नोटीस बजावली असून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
चितळे रस्त्यावरील एका दुकानातून अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी केरमी चीज या नावाने विक्री होणाऱ्या पदार्थाचे नमुने घेतले होते. पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या या नमुन्यांचा अहवाल नुकताच प्राप्त झाला.
या अहवालानुसार संबंधित पदार्थ हा खरा चीज नसून खाद्य तेलापासून बनविण्यात आलेला बनावट चीज सदृश्य पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले आहे.विशेष म्हणजे हा पदार्थ नामांकित कंपनीच्या नावे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आला आहे.
शहरातील विविध पिझ्झा कॉर्नर, बर्गर स्टॉल्स, चाट सेंटर येथे हाच पदार्थ वापरण्यात येत असल्याचेही आढळून आले आहे. ही कारवाई सहायक आयुक्त सोपन ह. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे, सहायक सागर शेवते व शुभम भस्मे यांनी केली.
