राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय
1 min read
मुंबई दि.२०:- मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली, तरीही राज्य मंत्रिमंडळाची बैठक नियमितपणे पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती होती.
या बैठकीत मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरमध्ये 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी मुंद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील गट-क (तांत्रिक) संवर्गातील विविध पदावर 29 दिवस तत्त्वावर कार्यरत 17 कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर वाढला असून त्याचा आढावा राज्याच्या मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. मुंबईसह सर्वच जिल्ह्यातील ठिकाणच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. राज्यातील 12 ते 14 लाख एकरावरील पीक बाधित झालं असून शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पंचनाम्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात असून जनावरांचंही नुकसान झालं आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
