मुंबईत मोनोरेल पडली बंद; काचा फोडून २ तासांनी प्रवाशांना बाहेर काढले
1 min read
मुंबई दि.२०:- मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्याचा फटका वाहतूक सेवेला बसला आहे. लोकलसह बससेवा विस्कळीत झाली आहे. त्यातच मोनोरेल चेंबूर ते भक्ती पार्क धावत असताना तांत्रिक अडचणींमुळे बंद पडल्याची घटना घडली. चेंबूर ते भक्ती मार्ग दरम्यान मोनो रेल्वे २ तास अडकली.
मोनोमधील एसीदेखील बंद झाले. त्यामुळे प्रवाशी घामाघूम झाले. अनेकांचा श्वास कोंडला गेला. प्रवाशांनी काचांवर हात आपटत मदतीचा धावा सुरु केला. सुमारे २ तासांनंतर या मोनोरेलमधून प्रवाशांना काचा फोडून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं.चेंबूर ते भक्ती पार्क अशा धावणाऱ्या मोनोरेलमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि ही ट्रेन जागीच थांबली.
मोनोरेल एसी असल्याने दरवाजे बंद होते. मोनोरेल बंद झाल्यानंतर आधी आतील एसी बंद पडला. त्यामुळे आतील प्रवाशांना गुदमरल्याचा त्रास सुरू झाला. व्हेंटिलेशन सिंस्टिम बंद पडल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. त्यातच हळूहळू आतील लाईटही बंद पडली आणि अंधार झाला.
त्यामुळे या प्रवाशांमध्ये अधिकच भीतीचं वातावरण निर्माण झालं. सुमारे एक ते दीड तासांपासून हे प्रवासी आतमध्ये होते. त्यांच्या सुटकेसाठी मुंबई महापालिकेचे बचाव पथक हजर होतं. त्यातच ही मोनोरेल एका बाजूला कलल्याने प्रवाशांमध्ये अधिकच भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यातील काही प्रवाशांनी हात जोडल्याचं आणि आपल्याला वाचवण्याची विनंती केल्याचं दिसून आलं.
सुरुवातीला काच फोडून आतील प्रवाशांना बाहेर काढण्याचं नियोजन सुरू होतं. पण आत असलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे आतील प्रवाशांनी काचेवर हात मारण्यास सुरूवात केली. एका प्रवाशाने काच फोडली आणि त्यामुळे बाहेरची हवा आत गेल्याने प्रवाशांनी काहीसा सुटकेचा निश्वास टाकला.
दरम्यान, कुणीही काचेच्या जवळ थांबू नये असं आवाहन बचाव पथकाकडून करण्यात येत होते. तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेल्या मोनो रेल्वेतून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दलाने मदत कार्य सुरु केले.
बचाव पथकाने दोन ठिकाणच्या काचा फोडल्या आणि सर्व प्रवाशांना बाहेर काढलं. त्याचवेळी महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक तयार ठेवण्यात आलं होतं. तसेच नजीकच्या महानगरपालिका रुग्णालयास सुसज्ज राहण्याचे आदेशही देण्यात आले होते.
