श्रीरामपूर-परळी ब्रॉडगेज प्रकल्प पुन्हा सुरू करा:- खासदार निलेश लंके
1 min read
अहिल्यानगर दि.२०:- पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा अत्यंत महत्वाचा नेवासे, शेवगाव, गेवराई मार्गे श्रीरामपूर-परळी ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्प केंद्र सरकारकडून स्थगित करण्यात आल्याच्या निर्णयावरून संताप व्यक्त करत या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
खासदार लंके यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले. त्यात प्रकल्पाचे सामाजिक, भौगोलिक आणि धोरणात्मक महत्व अधोरेखित करत निर्णय पुन्हा विचाराधीन घेण्याची मागणी केली आहे.पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा हा महत्वाचा दुवा आहे.
अहिल्यानगर, औरंगाबाद व बीड सारख्या मागास जिल्ह्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणारा हा रेल्वेमार्ग महत्वाचा आहे.पुणे मुंबई,औरंगाबाद या शहरांमध्ये शिक्षण, रोजगारासाठी जाणाऱ्या नागरिकांना स्वस्त, सुरक्षित आणि जलद प्रवास सुविधा उपलब्ध होईल.
कृषिप्रधान भागातील शेतकऱ्यांना मोठया बाजारपेठा सहज उपलब्ध होऊन वाहतूक खर्चात बचत होईल. वाढत्या अवजड वाहनांच्या पार्श्वभुमीवर रेल्वे ही एक उत्तम पर्यायी वाहतून व्यवस्था ठरू शकते असे सांगतानाच राज्य शासनाने या प्रकल्पासाठी ५० टक्के भागीदारी सन २०२२ मध्ये मान्य केली ही बाब महत्वाची असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
