राज्यात पावसाचा कहर; प्रशासनाच्या सतर्कतेच्या सूचना

1 min read

मुंबई दि.२०:- गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाकडून उद्या म्हणजे २० ऑगस्ट रोजी देखील अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.हवामान विभागाच्या या अंदाजामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात तसेच महानगरपालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी दिसली आहे. यामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र उद्या 20 ऑगस्टसाठी अद्याप महापालिकेकडून सुट्टीबाबत कोणतेही अपडेट देण्यात आलेले नाहीत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पालिका, खाजगी शाळा व महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टी असल्याने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रक काढून उद्याची सुट्टी जाहीर केली आहे.हवामान खात्याने अंदाज वर्तवल्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असल्याने मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी उद्या 20 ऑगस्ट रोजी रत्नागिरीतील सर्व जिल्हा परिषद, अंगणवाडी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केले आहे. सातारा जिल्ह्याला हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांकरता हा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे यामुळे सातारा जिल्ह्यातील पाटण, जावली, महाबळेश्वर, वाई,सातारा आणि कराड या तालुक्यातील सर्व अंगणवाड्या आणि शाळांना दोन दिवसांकरिता खबरदारी घेत सुट्टी देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता ध्यानात घेऊन ही सुट्टी देण्यात आली आहे.तसेच कोरेगाव, खटाव, खंडाळा,माण आणि फलटण या तालुक्यातील पर्जन्याची स्थिती पाहून तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांनी या ठिकाणी निर्णय घ्यावा असे आदेश सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यातील नद्यांची वाढती पाणी पातळी आणि पाऊसाच्या पार्श्वभूमीवर शाळांना 2 दिवस सुट्टी जाहीर. मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यासह महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळांना 20 व 21 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता नागरिकांना स्थलांतर झाल्यानंतर राहण्यासाठी शाळांची जागा,शाळा खोल्या उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!