सूर्या करिअर अकॅडमी आळेफाटा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम

1 min read

आळेफाटा दि.१६:-सूर्या करिअर अकॅडमी आळेफाटा (ता.जुन्नर) येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध उपक्रमांचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. अकॅडमीचे मार्गदर्शक श्रीकांत मदने यांच्या प्रेरणेतून व आरोग्य निरीक्षक विनोद कवळे (जालना) यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला.सकाळी राष्ट्रध्वज वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी परिसर “भारत माता की जय”च्या जयघोषांनी दुमदुमून गेला. अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गाणी, कविता व प्रभावी भाषण सादर करून उपस्थितांचे मन भारावून टाकले. विशेष पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती, शिक्षणाचे महत्त्व आणि समाजासाठी आपले योगदान कसे द्यावे याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.या सोहळ्यात अकॅडमीच्या अभ्यासिकेचे उद्घाटन, डिजिटल बोर्ड व डिजिटल क्लासरूमचे लोकार्पण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षणसुविधांचा लाभ व्हावा. यासाठी अकॅडमीने घेतलेली ही पुढाकारपुर्ण पावले उपस्थित मान्यवरांनी कौतुकास्पद ठरवली. डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणे स्पर्धा परीक्षांची तयारी अधिक आत्मविश्वासाने करता येणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.कार्यक्रमात वृक्षारोपण उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी झाडांची काळजी घेण्याची शपथ घेतली. तसेच माजी विद्यार्थी व माजी सैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.शिक्षक, कर्मचारी व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचाही सन्मान करून त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली.सूर्या करिअर अकॅडमी आळेफाटा ही केवळ शैक्षणिक संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचे कार्य या अकॅडमीने गेल्या काही वर्षांत यशस्वीपणे केले आहे. “शिस्त, आत्मविश्वास, स्पर्धात्मकता आणि देशभक्ती हीच खरी प्रगतीची शिदोरी” हेच अकॅडमीचे ब्रीद असल्याचे या कार्यक्रमातून ठळकपणे जाणवले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अकॅडमीचे शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे केले तर आभारप्रदर्शन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.स्थानिक ग्रामस्थ, पालक व नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम एक सामाजिक सोहळा ठरला. सूर्या करिअर अकॅडमीच्या या उपक्रमामुळे आळेफाटा परिसरात शिक्षणाचा आणि देशभक्तीचा नवा दीप प्रज्वलित झाल्याचे मत सर्व स्तरातून व्यक्त करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!