मंचर येथे शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला
1 min read
मंचर दि.१३:- आंबेगाव तालुक्यातील लोणी (बागवस्ती) येथील बिबट्याने शेतकर्यावर केलल्या हल्ल्यात त्यांच्या डाव्या पायाला व हाताला नख्या लागून जखमा झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बाळासाहेब वाल्हू वाळुंज (वय ५१) असे शेतकऱ्याचे नाव आहे.
ही घटना मंगळवारी (दि. १२) पहाटेच्या सुमारास घडली. पहाटे गोठ्यातील कुत्रा जोरात ओरडत असल्याचा आवाज ऐकून वाळुंज गोठ्याकडे गेले.बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केलेला दिसला. काठी हातात घेऊन ते जवळ जाताच बिबट्याने कुत्रा सोडून त्यांच्यावर झडप घातली.
प्रतिकार करताना हातालाही जखम झाली. त्यांच्या आरडाओरडामुळे बिबट्या पळून गेला. वाळुंज यांच्या मते, हल्ला करणाऱ्या बिबट्याशिवाय जवळच्या शेतात आणखी दोन बिबटे दिसले.२७ जुलै रोजी लोणीतीलच गेनभाऊ वाळुंज यांच्या वासरावरही बिबट्याचा हल्ला झाल्याची घटना घडली होती.
खडकवाडी-लोणी परिसरात बिबट्यांचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभाग पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची कारवाई करणार असल्याची माहिती मंचर वन परीक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली.
