पहिलीपासून NCC चे प्रशिक्षण देण्याचा मानस:- शिक्षण मंत्री दादा भुसे
1 min read
पुणे, दि.११:- विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी व त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा यासाठी मुलांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.एनसीसीचा राज्यातील विस्तार, प्रशिक्षणाचे स्वरूप,
त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आदींबाबत चर्चा करण्यासाठी मंत्रालयात बैठक झाली. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, राहुल रेखावार, एनसीसीचे संचालक जेनीष जॉर्ज, कर्नल संतोष घाग, लेफ्टनंट कर्नल अजय भोसले आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये देशाविषयी आदर निर्माण होण्याच्या दृष्टीने या वर्षी स्वातंत्र्य दिन समारंभात देशभक्तिपर गीतांवर कवायती सादर केल्या जाणार आहेत. राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना एनसीसीचे प्रशिक्षण मिळावे या अनुषंगाने राज्यातील एनसीसीची प्रशिक्षण केंद्र वाढवून मिळावीत.
तसेच अधिक शाळांमधील विद्यार्थी त्यात सहभागी व्हावेत, यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी माजी सैनिक कल्याण मंडळाच्या मदतीने माजी सैनिकांचीदेखील मदत घेण्यात येईल.राज्यातील एनसीसीची केंद्रे, प्रशिक्षकांची संख्या, प्रशिक्षणाचे स्वरूप आदींची माहिती दिली.
सध्या राज्यात सात ग्रुप्स आणि ६३ युनिट्स असून यात १ हजार ७२६ शाळा, महाविद्यालयांतील १ लाख १४ हजारांहून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. लवकरच यातील १० केंद्रांचा विस्तार होऊन यात अधिकचे २० हजार ३१४ विद्यार्थी जोडले जातील, असे एनसीसीच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केले आहे.
