रेल्वे अपघातात 288 जणांचा मृत्यू, 900हून अधिक जखमी; रुग्णालयात माणुसकीचे दर्शन; रक्तदानासाठी रांगा
1 min read
ओडिसा दि.३:- ओडिसा राज्यामधील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ काल (शुक्रवारी) सायंकाळीत साडेसातच्या सुमारास तीन रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 288 जणांचे मृत्यू देह आढळून आले आहेत, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
देशातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनचे अनेक डबे उद्ध्वस्त झाले. एक इंजिन मालगाडीच्या रॅकवरच चढले. ही टक्कर इतकी भीषण होती की खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि जवळपास 50 लोक बाहेर फेकले गेले.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या मोठ्या अपघातानंतर ओडीशामध्ये माणुसकीचे दर्शन पाहायला मिळाले आहे. जखमींना वाचवण्यासाठी रक्ताची गरज असल्याने मोठ्या संख्येने रक्तदान करण्यासाठी हॉस्पिटलबाहेर लोकांच्या रांगा लागल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
यावेळी सरकारकडून कोणतेही आवाहन करण्यात आले नव्हते, तरी देखील लोकांनी स्वत:हून पुढाकार घेत रक्तदान करण्यासाठी हॉस्पिटल गाठले. येथील नगरिकांचे कौतुकास्पद कार्य पाहून अनेकजण भारावून गेले आहेत.
एवढ्या संख्येने लोक रक्तदान करण्यासाठी आल्याने डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. लोकांना जखमींचे प्राण वाचवायचे आहेत. कठीण काळातही असे चित्र देशाला दिसल्याने जगात आजही माणुसकी शिल्लक असल्याचे चित्र दिसत आहे.