निमगाव सावा येथे वृक्षारोपण उपक्रम संपन्न
1 min read
निमगाव सावा दि.४:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत निमगाव सावा यांच्या संयुक्त विद्यमाने गावामध्ये वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि हरित गाव संकल्पनेला चालना देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार
यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाने करण्यात आल्याची माहिती निमगाव सावाचे सरपंच किशोर घोडे यांनी दिली. दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आंबा,कदंब आणि कांचन या वृक्षांची लागवड करण्यात आली.
तसेच निमगाव सावा ग्रामपंचायत परिसर, स्मशानभूमी, खामगाव परिसर,आंबापट्टी परिसर या ठिकाणी पारिजातक, कदंब आवळा,जास्वंद, कांचन, फॉक्सटेल पाम, मोरपंखी, वड, फणस, आंबा, अपाटा, पिंपळ, कडुलिंब, कढीपत्ता, बांबू, सिताफळ,चिंच, जांभूळ, सुबाभूळ, गोकुळ अशा विविध प्रकारची एकूण 400 झाडांची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, रानमळा गावचे माजी सरपंच सुरेश तिकोणे, सुभाष मिटकरी, निमगाव सावाचे सरपंच किशोर घोडे, गणपत घोडे गुरुजी, अब्दुल पटेल, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिपान पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन बेहेडे,
दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.झाडे लावण्यासाठी खड्ड्यांमध्ये माती आणि शेणखत भरणे. तसेच प्रत्येक खड्ड्यापर्यंत झाडांची रोपे नेऊन ठेवणे.
व त्यांची लागवड करणे यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना या विभागातील स्वयंसेवकांनी आणि इतर विद्यार्थ्यांनी अनमोल असे सहकार्य केल्याबद्दल सरपंच किशोर घोडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून आभार मानले.
