लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

1 min read

निमगाव सावा दि.१:- येथील श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ (वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय निमगाव सावा यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात व अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला महाविद्यालयीन सेवक शांताराम गाडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.प्रा.अजय नन्नवरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. सुभाष घोडे यांनी लोकमान्य टिळक यांनी जहाल विचारसरणी आणि धारदार लेखणीतून इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडल्याचे सांगितले. प्रा. अमित साळवे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.यावेळी सिद्धी गाडगे व साक्षी गाडगे या विद्यार्थिनींनी अण्णाभाऊ साठे यांचे समाजासाठीचे योगदान, कार्यकर्तृत्व आणि लोककलांना दिलेले महत्व विषद करणारे भाषण सादर केले. लोकमान्य टिळकांच्या कार्याचेही स्मरण करण्यात आले व “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” या त्याच्या घोषणेला उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या विचारांचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी यांनी केले. याप्रसंगी ग्रामस्थ, विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीने कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीलम गायकवाड यांनी केले व प्रा.माधुरी भोर यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!