आज पासून बदलणार अनेक नियम; युपीआयपासून क्रेडिट कार्डपर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या नियमांचा समावेश
1 min read
मुंबई दि.१:- नवीन महिन्याचा आज पहिला दिवस आहे. आजपासून ऑगस्ट महिना सुरू झाला आहे आणि या महिन्याच्या सुरुवातीपासून अनेक नियम बदलणार आहेत. यामध्ये युपीआयपासून क्रेडिट कार्डपर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या नियमांचा समावेश आहे. नवीन महिना काही बदल घेऊन आला आहे.
ज्यांचा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात खोलवर परिणाम होईल.यामध्ये UPI चे नवीन नियम, SBI क्रेडिट कार्डशी संबंधित विमा सुविधेत कपात, पंजाब नॅशनल बँकेची KYC अंतिम मुदत आणि खाजगी वाहनांसाठी फास्टॅगचा नवीन वार्षिक पास यांचा समावेश आहे. आजपासून LPG सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल दिसून येणार आहे.
तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरचा दर 33.50 रुपयांनी कमी केला आहे ज्याचा फायदा हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबेवाल्यांना होणार आहे. त्याचवेळी, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती मात्र पुन्हा एकदा स्थिर ठेवल्या गेल्या आहेत.
1 ऑगस्टपासून UPI वापरकर्त्यांना आता कोणत्याही एका ॲपवरून दिवसातून फक्त 50 वेळा बॅलन्स तपासण्याची सुविधा मिळेल. तुम्ही दोन वेगवेगळे ॲप्स वापरत असाल तर प्रत्येक ॲपवर ही मर्यादा स्वतंत्रपणे लागू केली जाईल. तसेच पीक अवर्समध्ये (सकाळी 10 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9:30)
बॅलन्स तपासण्याचा प्रवेश प्रतिबंधित किंवा मर्यादित केला जाईल जेणेकरून सर्व्हरचा भार कमी होईल.एसबीआयचे क्रेडिट कार्ड नियम आजपासून बदलत आहेत. आजपासून बँकेच्या अनेक को-ब्रँडेड कार्डवर उपलब्ध असलेले मोफत हवाई अपघात विमा कव्हर बंद केले जात आहे.
आता प्रत्येक यशस्वी पेमेंटनंतर, बँक स्वतः तुम्हाला एसएमएस किंवा इन-ॲप नोटिफिकेशनद्वारे तुमच्या खात्यात किती बॅलन्स शिल्लक असल्याची माहिती दिली जाईल. यामुळे दुकानदार, फ्रीलांसर, लहान व्यावसायिकांना वारंवार बॅलन्स तपासण्याची गरज राहणार नाही.
15 ऑगस्टपासून खाजगी वाहन मालकांसाठी नवीन FASTag वार्षिक पास उपलब्ध असेल. हा पास 3000 रुपयांना उपलब्ध असेल आणि एक वर्ष किंवा 200 टोल व्यवहारांसाठी (जे आधी पूर्ण होईल) वैध असेल.
वारंवार महामार्गावर येणाऱ्या प्रवाशांना किफायतशीर आणि सोयीस्कर पर्याय देण्यासाठी ही योजना आणण्यात आली असून हा वार्षिक पास घेणे अनिवार्य नाही.
