मालेगाव बाँम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल; १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण; निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष

1 min read

मुंबई दि.३१:- 29 सप्टेंबर 2008 साली मालेगाव शहर हादरवणाऱ्या भीषण बॉम्बस्फोटाला आज जवळपास 17 वर्षं पूर्ण होत आहेत. या स्फोटात 6 निरपराध नागरिकांचे प्राण गेले. तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते. बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर अनेक कुटुंबं उध्वस्त झाली होती. आता, तब्बल 17 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयात आज गुरुवारी लागणार आहे. त्यामुळे आजच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं आहे.असे म्हटले जाते कि, बॉम्बस्फोट एवढा जबरदस्त होता की आजूबाजूची घरं आणि दुकानांचं मोठं नुकसान झालं होतं. पुढच्या महिन्यात ऑक्टोबर 2008 मध्ये या मालेगाव बॉम्बस्फोटांचा तपास सुरू झाला. तपासात अभिनव भारत संस्थेचं नाव समोर आलं. या प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल पुरोहितांसारख्या 12 हायप्रोफाईल आरोपींना अटक झाली. या बॉम्बस्फोट प्रकरणी सुरुवातीच्या तपासामध्ये मुस्लीम समाजाकडे संशयाची सुई होती. या बॉम्बस्फोटामागे बंदी असलेल्या सिमी संघटनेचा हात असू शकतो, अशी चर्चा होती.मात्र या तपासावेळी सापडलेल्या मोटरसायकलनं तपासाची दिशा बदलली. एटीएसनं साध्वी प्रज्ञासिंह आणि लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहितना अटक केली. आणि इथेच जन्म झाला भगवा दहशतवाद शब्दाचा. समीर कुलकर्णी हा ही मालेगाव बॉम्बसोटातील आरोपी पैकी एक होता. त्याचं म्हणणं आहे की 2009 मध्ये होणाऱ्या निवडणुका डोळ्या समोर ठेवून तपासाची दिशा बदलली गेली. सरकारच्या दबावात पुढे भवगा दहशतवाद ही संकल्पना मांडली गेली, असा आरोप त्याने केला आहे. मालेगावात जिथे स्फोट झाला, तिथून जवळच सिमीचं ऑफिस होतं. याच ऑफिसमध्ये बॉम्ब तयार करण्यात आले. हे बॉम्ब मोटरसायकलवरुन नेत असताना त्यांचा स्फोट झाला,असा साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या वकिलाचा दावा होता.2009 मध्ये NIA कडे मालेगाव स्फोटांचा तसाप सोपवण्यात आला. 2011 मध्ये स्फोटांप्रकरणी पहिलं आरोपपत्र दाखल झालं. 2016 मध्ये सबळ पुरावे नसल्याचं कारण देत NIA नं साध्वी प्रज्ञा आणि इतर 6 जणांविरोधात मोक्का हटवून नव्यानं आरोपपत्र दाखल केलं. कोर्टानं 12 पैकी 5 जणांना क्लीनचिट दिली. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर, कर्नल पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी या सात जणांविरोधात खटला सुरू राहिला. 17 वर्षं सुरू असलेला खटला, सात हायप्रोफाईल आरोपी, साक्षीदारांनी बदललेली साक्ष, तपासयंत्रणांमधले मतभेद आणि भगवा दहशतवाद शब्दाला जन्म देणाऱ्या या खटल्याचा निकाल काय लागणार? याची महाराष्ट्रासह देशाला उत्सुकता आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!