आजोबांच्या मृत्यूचं दुखः सहन न झाल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या नवविवाहित नातीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
1 min read
छत्रपती संभाजीनगर दि.२८:- छत्रपती संभाजीनगर येथून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. वृद्धापकाळाने आजोबांचा मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधी सुरू असताना आजोबा सोडून गेल्याचे दुःख सहन न झाल्याने ४ महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नवविवाहित १९ वर्षीय नातीला हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात उपचार सुरू असताना नातीनेही प्राण सोडला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा एकापाठोपाठ मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.
नरसिंग हनुवंता गायकवाड असे निधन झालेल्या आजोबांचे नाव आहे. तर पुनम (उर्फ छकुली) विक्रम तुपे (वय १९) असे मयत झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आळंदी येथे राहणारे नरसिंग गायकवाड यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. या घटनेमुळे सर्व नातेवाईक आळंदी येथे आले.
आजोबांचे निधन झाल्यामुळे नवविवाहित पूनम देखील आळंदी येथे आली.घरातील ज्येष्ठ नागरिक गेल्याने नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. याचवेळी पूनमच्या छातीत त्रास होऊ लागला. यामुळे पूनमला तात्काळ आळंदी येथील रुग्णालयात दाखल केले.त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र पूनमच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. दरम्यान उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी पूनमने प्राण सोडले. अगोदरच कुटुंबात घरातील जेष्ठ नागरिक गेले. त्या पाठोपाठ नवविवाहितेचा मृत्यू झाल्याने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबियांनी रुग्णालयातच टाहो फोडला.
दरम्यान, या घटनेमध्ये मयत झालेल्या पूनमचा चार महिन्यांपूर्वी शेवता या गावातील विक्रम तुपे यांच्याशी विवाह झाला होता. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. शोकाकुल वातावरणात पूनमच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
