आमदार शरद सोनवणे यांनी चूक मान्य करून हात जोडून भरचौकात मागितली जाहीर माफी
1 min read
आळेफाटा दि.२७:- जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी रामोशी समाज व फासे पारधी समाजाबद्दल जे अपशब्द वापरले त्याबद्दल रामोशी समाजाच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला. आमदार शरद सोनवणे यांनी रामोशी समाजाची जाहीर माफी मागावी,
असे आवाहन रामोशी समाजाचे महाराष्ट्र राज्याचे समीती सदस्य दादा मदने व पुणे जिल्हाध्यक्ष शंकर गोफणे यांनी आळेफाटा येथे केले.आमदार शरद सोनवणे यांनी रामोशी समाजाबद्दल अपशब्द वापरले. त्याबद्दल रामोशी समाजाच्या वतीने आळेफाटा या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
यावेळी मदने म्हणाले, काल प्रसार माध्यामांसमोर बोलताना जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी रामोशी समाज व फासे पारधी समाज नगर हद्दीतून येवून चोऱ्या करतात असे गंभीर वक्तव्य केले आहे.संपूर्ण समाजालाच चोर म्हणणे हे अत्यंत चुकीचे विधान असून हे निषेधार्ह आहे.
त्यांच्या या बेताल वक्तव्याने संपूर्ण समाजात तीव्र नाराजी पसरली असून संपूर्ण समाज त्यांच्या विरोधात एकवटलेला असून समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष शंकर गोफणे, आळेगावचे सरपंच मुकुंद भंडलकर, बाळासाहेब शिरतर, संदीप शितोळे, मच्छिद्र गुळवे विपुल यलमर,
बबलू भंडलकर, धोंडीभाऊ भंडलकर, बाळासाहेब शितोळे, कैलास शिरतर, आनंद शिरतर, हरिभाऊ भंडलकर, गौरी शिरतर, राणी चव्हाण आदी उपस्थित होते. आमदार शरद सोनवणे यांनी आंदोलनस्थळी येऊन रामोशी समाजाची माफी मागितली. आ. सोनवणे म्हणाले,
जुन्नर तालुक्यातील वाढत्या चोऱ्या दरोडे व हल्ले पाहता लोकप्रतिनिधी या नात्याने माझे मन विचलित झाले. अनावधाने माझ्या तोंडातून चुकीचे विधान झाले. चुक ही चूकच असते पण झालेली चूक ही मान्य करून मी हात जोडून माझ्या समस्त रामोशी बांधवांची जाहीर माफी मागतो.
