ITC Mission sunehara Kal व जलसंपदा विभागाच्या संयुक्त विद्यमाने जल व्यवस्थापनावरील कार्यशाळा संपन्न

1 min read

पुणे दि.२६:- ITC व महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या संयुक्त विद्यमाने “सार्वजनिक-खाजगी भागीदारीद्वारे शाश्वत जलसंपदा व्यवस्थापन” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन यशदा, पुणे येथे करण्यात आले. या कार्यशाळेत सरकारी अधिकारी, जल वापर संघ (WUA) सदस्य, विविध औद्योगिक व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि जल क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले. कार्यशाळेचे उद्घाटन जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजीव बेलसरे यांच्या हस्ते झाले. त्यांनी पाणी वापर संस्था आणि उद्योग क्षेत्राच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करताना, पाण्याचा शाश्वत व नियोजनबद्ध वापर आणि शेतीतील भूमिकेवर भर दिला. “जलसंवर्धन हे केवळ सरकारचे कार्य नसून, नागरिक, शेतकरी आणि उद्योग यांचेही महत्त्वाचे योगदान अपेक्षित आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.डॉ. हेमंत धुमाळ, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, यांनी “माझा कालवा, माझी चारी” या उपक्रमाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी शेतकऱ्यांनी स्वतःच्या पाणी लाभाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी जागरूक राहून व्यवस्थापनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.डॉ. भारत काकडे, अध्यक्ष, BAIF संस्थेचे, यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जल व्यवस्थापन आणि जलसंधारणातील नविन तंत्रज्ञान व स्मार्ट शेती पद्धती यावर सखोल मार्गदर्शन केले.“पुढील पिढ्यांसाठी पाणी वाचविणे ही आजची जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले.अखिलेश यादव, प्रादेशिक व्यवस्थापक, ITC यांनी प्रथम टप्प्यातील भागीदारी कार्यक्रमाची माहिती सादर करत यामधील यशस्वी उपक्रम मांडले. कार्यक्रम व्यवस्थापक मुनेश सक्सेना, किशोर रटाटे, आणि हनुमंत देशमुख यांनी कार्यशाळेतील विविध सत्रांमध्ये सहभाग घेतला.कार्यशाळेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे “कार्यक्षम जलवापर व सुशासनात जल संस्था व युटिलिटीजची भूमिका” या विषयावरील पॅनेल चर्चा होती. या चर्चेमध्ये खालील मान्यवरांनी सहभाग घेतला: वैशाली नारकर, अधीक्षक अभियंता व संचालक, जलसंपदा विभाग प्रशांत कडुसकर, कार्यकारी अभियंता, कोयना प्रकल्प महेश रामसंकर, कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग मोहन शर्मा, कार्यकारी संचालक, DSCडॉ. पी.पी. शिंदे, वरिष्ठ वैज्ञानिक, VSI या कार्यशाळेत अ.नगर, पारनेर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यातील WUA सदस्य, तसेच जलसंपदा विभागाचे सर्व कार्यकारी अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन ITC, BAIF, DSC आणि श्रमजीवी संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आले. समारोप सत्रात सहभागी प्रतिनिधींनी सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून जलसंवर्धन आणि कार्यक्षम पाणी वापर यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!