दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात “सक्षम तू” कार्यशाळा उत्साहात संपन्न
1 min read
निमगाव सावा दि.२३:- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयात महिला
सबलीकरण मंच आणि राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) यांच्या संयुक्त विद्यमाने “सक्षम तू” या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेचे उद्दिष्ट विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास,स्वावलंबन आणि नेतृत्वगुणांची जाणीव निर्माण करणे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व पांडुरंग प्रतिमा पूजन आणि विद्यापीठ गीताने झाली. यानंतर प्रमुख पाहुणे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला निरीक्षक उज्वला शेवाळे, जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष सुप्रिया लेंडे, हवालदार सुवर्णा गडगे, पंडित नेहरू विद्यालयातील प्राध्यापिका शर्मिला आहेर,
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष कविता पवार यांनी आपल्या मार्गदर्शनातून महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी उचलली जाणारी पावले,सामाजिक जबाबदाऱ्या व सशक्तीकरणाचे विविध पैलू यावर मोलाचे विचार मांडले.
नारायणगाव पोलीस स्टेशन दामिनी पथक कॉन्स्टेबल शेख अलीषा यांनी आपल्या मनोगता तून
“मुलगी ही बापाची परी नसून ती वाघीण आहे”. मुलींनी आपले स्वसंरक्षण केले पाहिजे, मुलगी ही सक्षमच आहे परंतु हे सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. आपल्यावर होणारा अन्याय, जुलूम याला वाचा फोडली पाहिजे.यासाठी पोलीस कर्मचारी सदैव तत्पर आहेत.
आपण आपल्या अडचणीच्या वेळी 112 या क्रमांकावर कॉल करू शकता.तसेच मुलींनी सोशल मीडियाचा आपल्या जीवनात योग्य वापर करावा. आपण सुशिक्षित,सुज्ञ आहात. योग्य अयोग्य आपल्याला कळते. पालकांनीही आपल्या मुलांवरती लक्ष ठेवावे. कोणत्याही मुलीला तक्रारीसाठी आमचे निर्भया आणि दामिनी पथक सदैव तत्पर असल्याचे सांगितले.
कार्यशाळेत दोन सत्रांद्वारे स्व-संरक्षण, आत्मभान, नेतृत्व विकास आणि समुपदेशन या महत्त्वाच्या विषयांवर माहिती व प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. प्रामुख्याने दिलीप वळसे पाटील महाविद्यालय, श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालय आणि पंडित नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील एकूण 100 विद्यार्थिनींनी या सत्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे यांनी कार्यशाळेचे आयोजन हे काळाची गरज असल्याचे नमूद करत पुणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार,संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार,संस्था प्रतिनिधी कविता पवार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्यांनी कार्यक्रम आयोजकांचे कौतुक केले.
महिला सबलीकरण मंचाच्या समन्वयक प्रा. नीलम गायकवाड यांनी प्रास्ताविक व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.ज्योती गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले व रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.माधुरी भोर यांनी आभार व्यक्त केले.
