पोलिसांना आता मोबाईलवर फोटो काढून दंड करण्यास बंदी
1 min read
पुणे दि.२१:- वाहतूक शाखेच्या पोलिसांना आता वाहने थांबवून स्वतःच्या मोबाईल फोनचा वापर करून फोटो किंवा चित्रीकरण करता येणार नाही. जर कोणी असे करताना आढळल्यास, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.हा महत्त्वपूर्ण निर्णय अपर पोलिस महासंचालक (वाहतूक), प्रवीण साळुंके यांनी सर्व पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांना दिलेल्या पत्राद्वारे जाहीर केला आहे.
याआधीही वाहतूक नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यासाठी ई-चलान मशीनचा वापर करण्याचे आदेश दिले होते, पण तरीही काही पोलिस अधिकारी वैयक्तिक मोबाईल फोन वापरून चुकीच्या पद्धतीने चलान तयार करत असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
या तक्रारींवरून, २ जुलै रोजी परिवहन मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत वाहनचालक आणि मालक संघटनांच्या प्रतिनिधींनी पोलिसांच्या वैयक्तिक मोबाईल वापरामुळे गोपनीयतेचे उल्लंघन होत असल्याच्या आणि गैरवापराच्या शक्यतांबाबत चिंता व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर, आता सर्व दंडात्मक कारवाई केवळ अधिकृत कॅमेऱ्यांद्वारे आणि सिस्टमवर रेकॉर्ड ठेवून, तसेच रिअल टाइम डेटाच्या आधारे केली जाईल.जर कोणत्याही पोलिसाने स्वतःच्या मोबाईलवर फोटो काढून दंडात्मक कारवाई केली,
तर त्याच्यावर तत्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश ३ जुलै रोजी देण्यात आले आहेत. नागरिकांना आवाहन आहे की, जर असे गैरप्रकार आढळल्यास त्यांनी तात्काळ संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.
