राज्यात प्लॅस्टिक फुलांवर येणार बंदी
1 min read
मुंबई दि.१८:- सणासुदीला, विविध उत्सवात सजावटीसाठी येणाऱ्या प्लॅस्टिक फुलांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून प्रदूषणही वाढत आहे. यामुळे कृत्रिम फुले बंद व्हावीत व फुल उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक लावून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार रोहित पाटील यांनी निवेदनाद्वारे केली.
या मागणीला १०५ आमदारांच्या सहीसह पाठिंबापत्र जोडले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी लवकरच फलोत्पादनमंत्री भरत गोगावले व पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले आहे. विशेष म्हणजे मंत्री गोगावले यांनीदेखील शासन कृत्रिम फुलांवर
बंदी आणेल, असे म्हटले आहे.
राज्यात सर्रासपणे प्लॅस्टिक फुलांचा वापर प्रचंड प्रमाणात झाला आहे. त्यामुळे फुलांचा दर कमी होऊन शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.प्लॅस्टिक पिशव्यांवर ज्याप्रमाणे शासनाने बंदी आणली त्याप्रमाणे या प्लॅस्टिकच्या फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध घातल्यास त्याचा शेतकरीवर्गास मोठा फायदा होणार आहे.
द्राक्षपिक व इतर फळपिकांना पर्यायी व्यापारी पिक म्हणून फुलशेती केली जाते. या फुलशेतीसाठी लागणारी औषधे, मजुरी व ट्रान्सपोर्ट खर्च पाहता शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे प्लॅस्टिक फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध आणून फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
शासन कृत्रिम फुलांवर बंदी आणेल, आम्ही सीएमसोबत मीटिंग घेतली असून त्यात हे ठरले आहे. कृत्रिम फुलांमुळे शेतकरीवर्गाला फटका बसतो, पण त्याचवेळी रासायनिक कलर वापरणेही यामुळे थांबेल, असे भरत गोगावले यांनी सांगितले आहे. आमदार महेश शिंदे यांनी सभागृहात लक्षवेधी उपस्थित करीत हा मुद्दा चर्चेला आणला होता. त्यावर, हा निर्णय घेण्यात आला आहे.
