विद्यानिकेतन मध्ये रंगला रिंगण सोहळा; पांडुरंग साळवे यांनी केली पालखीची पूजा

1 min read

साकोरी दि.६:- साकोरी (ता.जुन्नर) येथील विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी आणि पी.एम.हायस्कूल च्या वतीने लहान वयात मुलांना आपल्या भारतीय संस्कृतीची जाणीव व्हावी या हेतूने दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठल मूर्तीच्या पूजेने आणि आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संकुलाचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग साळवे, तसेच प्राचार्या रुपाली पवार (भालेराव) व प्राचार्य रमेश शेवाळे यांनी पालखीची पूजा केली. चिमुकल्या विद्यार्थांच्या हस्ते आरती झाली. पालखी रंगीत कागद आणि फुले यांनी सजविली होती.या आनंदमयी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने इयत्ता ज्युनिअर के.जी.ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.यावेळी विद्यार्थी विठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत दामाजी, संत गोरा कुंभार अशा विविध संतांच्या वेशभूषेत आले होते. तसेच टाळ, मृदुंग, तुळशी वृंदावन, भगव्या पताका इत्यादी हातात धरून नटलेल्या बाल वारकऱ्यांनी रिंगण सजले होते.
मुख्य आकर्षण असलेला खराखुरा अश्वराज रिंगणात फिरू लागताच विठोबा रखुमाईच्या गजराने विद्यालयाचा परिसर दुमदुमून गेला.अवघे ज्ञानमंदिर भक्तीमय झाले होते.ज्ञानपंढरीत रंगलेल्या या सोहळ्याला पालक प्रतिनिधींची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती.मुलांना आषाढी एकादशीचे महत्त्व सांगण्यात आले.अभंग आणि फेर, फुगडी, भक्तिगीत अशा पद्धतीने दिंडी सोहळा साजरा करण्यात आला.अनेक विद्यार्थ्यांनी भक्तीपर नृत्य,नाटिका सादर केल्या. विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका संगीता सोनवणे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आयोजन सहाय्य केले.शाळेतील सर्व शिक्षक पारंपरिक वेशभूषेत या सोहळयात सहभागी झाले होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!