वळसे पाटील महाविद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन

1 min read

निमगाव सावा दि.६ :- जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथील दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आषाढी एकादशीनिमित्त पारंपारिक पद्धतीने दिंडी आणि पालखी सोहळा आयोजन करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पालखीची सजावट करण्यात आली. पालखीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली यांची प्रतिमा आणि पंढरीचा पांडुरंग व रुखुमाईची मूर्ती आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवून त्याची विधिवत पूजा करण्यात आली.दिंडीची सुरुवात महाविद्यालय प्रांगणातून श्री विठ्ठलाच्या प्रतिमेस वंदन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी अभंग गायन, टाळ-मृदंग वाजवत विठ्ठलनामाचा गजर केला. पारंपरिक पोशाखात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचे दर्शन घडवले.कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांच्या हस्ते झाले.त्यांनी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायातील भक्तीपरंपरेचे महत्त्व सांगितले आणि सामाजिक सलोखा जपण्याचे संदेश दिला. कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. नीलम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि मराठी विभाग यांच्या सहकार्याने करण्यात आले.दिंडीमुळे महाविद्यालय परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी टाळ आणि मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा जयघोष केला. तसेच रिंगण करून आणि फुगडी खेळून टाळ आणि पखवाजाच्या ठेक्यावर हा सोहळा साजरा करत आनंद द्विगुणीत केला. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे परंपरेचे जतन आणि उत्सवाचे स्वरूप अधिकच आकर्षक झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.महाविद्यालयाने राबविलेल्या या उपक्रमाचे संस्थेचे संस्थापक व पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार तसेच संस्थेचे संदिपान पवार,सचिव परेश घोडे,खजिनदार व निमगावसावा चे सरपंच किशोर घोडे तसेच सर्व संचालक, संस्था पदाधिकारी यांनी प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!