गुंडेगावमध्ये युवकावर चाकूचे वार करत खून; पोलिसांनी तीन आरोपी घेतले ताब्यात

1 min read

अहिल्यानगर दि.२४:-गुंडेगाव (ता. अहिल्यानगर) येथे पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने वार करत व लाकडी दांडक्याने मारहाण करत खून करण्यात आला. ही घटना रविवारी (ता.२२) दुपारी १.३० ते २.३० या कालावधीत घडली. अहिल्यानगर तालुका पोलिसांनी सुप्यापर्यंत पाठलाग करत तीन आरोपींना सिनेस्टाईल पद्धतीने ताब्यात घेतले. बळीराम देविदास शिंदे (वय २८, रा. गुंडेगाव, ता. अहिल्यानगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. बळीराम किराणा व इतर साहित्य आणण्यासाठी बाहेर गावी गेला होता. येताना त्याचे आरोपींशी वाद झाले होते. त्यातून गुंडेगाव-देऊळगाव सिद्धी रस्त्यावरील एका वळणाजवळ आरोपींनी बळीरामच्या कारला अडवले. त्याला लाकडी दांडके व दगडांनी मारहाण करत चाकूचे वार केले. तसेच त्याची कार रस्त्याच्या खाली लोटून दिली. या संदर्भात बळीरामचा भाऊ लक्ष्मण शिंदे याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. जखमी बळीरामला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र, उपचारापूर्वी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावेळी आरोपी पुण्याच्या दिशेने वाहनातून चालले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतले. राहुल दिलीप राऊत, डॅनियल येशुदास जावळे (दोघे रा. गुंडेगाव, ता. अहिल्यानगर) व अमोल भुजबळ (रा. वडगाव तांदळी, ता. अहिल्यानगर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!