बारावीच्या ‘नीट’ चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने निर्दयी बापाने पोटच्या मुलीला केली जबर मारहाण; मारहाणीत मुलीचा मृत्यू
1 min read
सांगली दि.२४:- शिक्षक असलेल्या बापाने मुलीला मारहाण करत तिची हत्या केल्याची संतापजनक घटना सांगलीमध्ये घडली आहे. मुलीला बारावीच्या नीट चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने त्या रागाच्या भरात वडिलांनी मुलीला जात्याच्या लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली.
त्या मारहाणीत मुलगी गंभीर जखमी झाली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सांगलीतील आटपाटी तालुक्यातील नेलकरंजी इथे हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. धोंडीराम भोसले असं लेकीला अमानुष मारहाण करणाऱ्या वडिलांचं नाव आहे.
या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.बारावीत शिकणाऱ्या साधनाला नीट परीक्षेत कमी गुण का मिळाले? असे विचारात माध्यमिक शिक्षक असलेल्या पित्याने मुलीला घरातच लाकडी खुंट्याने मारहाण केली .या मारहाणीतच मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सांगली जिल्ह्यात घडली.
साधना भोसले ही विज्ञान शाखेत शिकत होती. बारावीच्या चाचणी परीक्षेत साधनाला कमी गुण मिळाले .हे कळताच धोंडीराम भोसले प्रचंड संतापले. बारावीतील चाचणी परीक्षेत कमी गुण कसे पडले? असे म्हणत धोंडीराम भोसले यांनी रागाच्या भरात साधनाला लाकडी खुंट्याने मारहाण केली.
या मारहाणीत साधना ही गंभीर जखमी झाली. मारहाणीमुळे तिची अवस्था इतकी वाईट झाली की तिचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री 9.30 च्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. याबाबत मुलीची आई प्रीती भोसले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर रविवारी वडील धोंडीराम भोसले यांना पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे.
साधना आटपाडीत बारावीचे शिक्षण घेत होती. मेडिकलसाठी प्रवेश घेण्यासाठी ती तयारी करत होती. डॉक्टर होण्याचे तिचे आणि तिच्या कुटुंबियांचे स्वप्न होते. त्यासाठी खाजगी शिकवणी लावली होती. त्या शिकवणीत नुकतीच एक सराव परीक्षा झाली होती.
त्यात तिला कमी गुण मिळाले त्यामुळे वडील धोंडीराम चिडले होते. शुक्रवारी रात्री वडील धोंडीराम यांनी मुलगी साधनाला कमी गुण का मिळाले याचा जाब विचारत मारहाण केली. घरातच असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला जबर मारहाण केली.
साधनाच्या डोक्याला जबर मार लागला संपूर्ण शरीराला इजा झाली. तिला दवाखान्यात नेले असता उपचारापुुर्वीच तिचा मृत्यू झाला. साधना प्रचंड हुशार होती. दहावीत ९२.६० टक्के गुण तिने मिळवले होते.
डॉक्टर बनण्याचं तिचं स्वप्न होतं.पण केवळ नीटच्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून मुख्याध्यापक वडिलांकडूनच झालेल्या जबर मारहाणीत तिचा हकनाक बळी गेला आहे. या क्रूर घटनेने सांगली जिल्हा हादरून गेला आहे.
