व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी योगद्वारे आरोग्याची घेतली शपथ
1 min read
वडगाव कांदळी दि.२३:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, वडगाव कांदळी येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचा महत्त्वाचा वाटा असल्याने शाळेत विविध योगासने, श्वसन क्रिया व ध्यान यांचा सराव घेण्यात आला.
या उपक्रमाची सुरुवात शाळेच्या समन्वयिका जयश्री कुंजीर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक फायदे सांगत, दररोजच्या दिनचर्येत योगाचा समावेश करण्याचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमात इयत्ता १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, प्राणायाम, ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, शवासन अशा विविध योगासनांचा सराव केला. विद्यार्थ्यांना योग्य तंत्रासह योगाभ्यास कसा करावा, त्याचे शरीरावर होणारे परिणाम व जीवनशैली सुधारण्यातील योगाचे योगदान याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमात विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व सीईओ दुष्यंत गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रेरणेने शाळेत अशा आरोग्यवर्धक उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते.
शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षिका मानसी पाचपुते व पी.टी. शिक्षक अमेय देशमुख यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचा सहभाग आणखी वाढवण्यात यश मिळाले. त्यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. काही विद्यार्थ्यांनी योगासंबंधी सादरीकरण सुद्धा केले.शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नियमित व्यायाम, मन:शांती, एकाग्रता व निरोगी जीवनशैली याची जाण निर्माण झाली आहे. पालकांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आहे.
