कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक रिंगरोडला मंजुरी; नाशिक ते त्र्यंबक रस्ता सहापदरी करण्याचा निर्णय
1 min read
नाशिक दि.२३:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली ‘त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे २०२७ मध्ये होणाऱ्या ‘सिंहस्थ कुंभमेळा’च्या निमित्ताने रस्ते विकासासंदर्भातील नागपूर येथे बैठक पार पडली.
बैठकीस नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते.नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी आवश्यक रस्त्यांची निर्मिती व सुविधा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत करण्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली.
याबाबत लवकरच डीपीआर करून त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कुंभमेळाप्रती भाविकांची वाढती आस्था व होणारी गर्दी लक्षात घेऊन त्याचे यशस्वी नियोजन, पायाभूत रस्ते विकासाच्या सक्षमिकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्र शासनाच्या पातळीवर मदत व्हावी, अशी विनंती केली होती.
नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा विकास होणार असून भक्तांना अधिक सुरक्षित सुविधा उपलब्ध होतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बैठकीत नाशिक रिंगरोडला मंजुरी तसेच नाशिक ते त्र्यंबक रस्ता सहापदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
