इराण हादरला; अखेर इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची एन्ट्री; 3 अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब
1 min read
न्यूयाँर्क दि.२३:- इस्रायल आणि इराणमधील युद्धात आता अमेरिकाही उतरली आहे. अमेरिकेने इराणमध्ये घुसून हल्ला केला आहे. इराणच्या तीन अणू प्रकल्पांवर हा हल्ला केला आहे. यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान प्रकल्पाचा समावेश आहे. अमेरिकने हे हल्ले हवाई दलाच्या सर्वात प्रगत लढाऊ जेट बी२ बॉम्बर्सने केले.
या बॉम्बर्सनी या तीन ठिकाणी हजारो किलोग्रॅमचे बॉम्ब टाकले आहेत, असे म्हटले जात आहे. विशेषतः बंकर बस्टर बॉम्ब म्हणून ते प्रसिद्ध आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणू उर्जा केंद्रांवर हल्ला केला आहे.
फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानवर या केंद्रांवर यशस्वी हवाई हल्ला केला आहे. अमेरिकन सैन्याने पूर्ण तयारीने या ठिकाणांवर बॉम्ब टाकले. ज्यामध्ये फोर्डो हे मुख्य लक्ष्य होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले की, आम्ही इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील तीन अणुस्थळांवर यशस्वी हल्ले केले आहेत.
फोर्डोवर बॉम्बचा संपूर्ण पेलोड टाकण्यात आला. हल्ले करुन आमची सर्व लढाऊ विमाने आता इराणी हवाई हद्दीतून सुरक्षितपणे बाहेर पडली आहेत. जगातील इतर कोणत्याही सैन्याकडे ही क्षमता नव्हती. अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचे हे यश आहे. आता शांततेची वेळ आली आहे.
अमेरिकन हल्ल्याच्या काही तास आधी अमेरिकेने त्यांचे स्टिल्थ बी-२ बॉम्बर्स इराणकडे पाठवले होते. या निर्णयानंतर अमेरिका या युद्धात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर काही तासांतच अमेरिकेने इराणचे ३ अणू प्रकल्प उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे.
बी-२ बॉम्बर्स हे एकमेव विमान आहे जे बंकर बस्टर बॉम्ब टाकण्यास सक्षम आहे. अमेरिकेने या बी-२ बॉम्बर्सने फोर्डो नष्ट केले आहे. इराणविरुद्ध इस्रायलच्या लष्करी मोहिमेचा निर्णय घेण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवडे घेतले होते. दोन आठवड्यात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
ट्रम्प यांच्या या विधानाच्या आदल्या दिवशी अमेरिकेने त्यांचे अत्याधुनिक लढाऊ विमान बी२ बॉम्बर्स प्रशांत महासागरात असलेल्या त्यांच्या ग्वाम हवाई तळाकडे पाठवले होते. दरम्यान, आता स्थानिक वेळेनुसार, डोनाल्ड ट्रम्प रात्री १० वाजता राष्ट्राला संबोधित करतील.
मुख्य ठिकाण फोर्डोवर बॉम्बेचा पेलोड (एकाच वेळी अनेक बॉम्ब) टाकण्यात आला. आता सर्व विमान सुरक्षितपणे घरच्या दिशेने जात आहे. अमेरिकेच्या महान यौद्ध्यांचे अभिनंदन. अशी कारवाई करू शकेल असे सैन्य जगात कुठेही नाही. आता शांतता प्रस्थापित करण्याची वेळ आली आहे. या मुद्द्यांकडे तुम्ही लक्ष्य दिलंत त्याबद्दल आभार”, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
