सुरक्षारक्षकाला मारहाण करत किराणा दुकानातील पावणेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास

1 min read

आळेफाटा दि.२०:- आळेफाटा (ता. जुन्नर) येथील लक्ष्मी इंटरप्राइजेस या किराणा दुकानाचे राखवालदारास गुरुवार दि.१९ मध्यरात्री नंतर कारमधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी धमकावून जबर मारहाण करत उचलून दुसऱ्या ठिकाणी नेऊन सोडले. यादरम्यान दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करत रोख रकमेसह जवळपास पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली.याबाबत माहिती अशी की, आळेफाटा चौकापासून हाकेच्या अंतरावर नाशिक रोडला रस्त्याच्या बाजूला सुरेश खांडगे यांचे लक्ष्मी इंटरप्राइजेस हे किराणा मालाचे होलसेल दुकान आहे. रात्री अडीच वाजेच्या सुमारास तेथे एक कार आली त्यामधील चार जणापैकी दोघे खाली उतरून तेथील रखवालदार जगदीश गणेश ततवा यांस धमकावत मारहाण करून कारमध्ये बसवले व पुढे कार घेऊन गेले. रखवालदाराच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यास परिसरातच मोबाईल वर बोलत राहिले.यांनतर त्यांच्याशी संबंधित दुसरे अज्ञात चोरटे तेथे आले त्यांनी दुकानाचे शटर उचकटून प्रवेश करत दुकानाचे काउंटर मधे ठेवलेले ५० हजार रोख रक्कम व सुमारे २ लाख २० हजार रुपये किंमतीच्या सिगारेट असा पावणे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.यानंतर काही वेळाने या रखवालदार ततवा यांस पुन्हा जबर मारहाण करत त्यास पुणे -नाशिक महामार्गांवरील बोटा (ता. संगमनेर) परिसरात सोडून दिले.कार मधे चौघे जण होते ते मला सतत मारहाण करत आणि मोबाईल वर बोलत होते अशी रखवालदार यांनी पोलिसांना माहिती दिली.त्यास उपचारासाठी आळेफाटा येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या जबर मारहाणीत त्याचा खांदा निखळला आहे.सुरेश खांडगे यांचे फिर्यादी वरून आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!