संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरीच्या दिशेने प्रस्थान
1 min read
आळंदी दि.२०:- वरुणराजाच्या सरी झेलत ‘ज्ञानोबा-माउली’चा जयघोष आणि टाळ-मृदंगांच्या गजरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने गुरुवारी (दि.१९) रात्री पावणेअकराच्या सुमारास देऊळवाड्यातून पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले.
माइलींच्या समाधी मंदिरात पहाटे चार वाजता घंटा नादाने या वैभवी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर काकड आरती झाली. पहाटे सव्वाचार ते साडेपाच या वेळात माउलींना पवमान अभिषेक, पंचामृतपूजा व दुधारतीचा कार्यक्रम झाला.
त्यानंतर सकाळी नऊ वाजता माउलींच्या समाधीच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. दुपारी १२ च्या सुमारास माउलींना महानैवेद्य दाखविण्यासाठी दर्शनबारी बंद करण्यात आली. त्यानंतर गाभारा स्वच्छ करून समाधीस पाणी घालण्यात आले.
दुपारी साडेबारा ते पाच या कालावधीत पुन्हा भाविकांना दर्शन खुले करण्यात आले. सायंकाळी सात ते आठच्या सुमारास गुरुवारची माउलींची पालखी मिरवणूक पार पडली. रात्री आठ वाजता प्रस्थानच्या प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात झाली.मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून आत सोडण्यास सुरुवात करण्यात आली.
मानाच्या ४७ दिंड्या देऊळवाडा परिसरात दाखल झाल्यानंतर ‘ज्ञानोबा-माउली’च्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगांच्या गजराने अवघा मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. पांढरे शुभ्र बंडी-धोतर आणि डोक्यावर पांढरी टोपी, हातात टाळ, पताका घेऊन असलेला वारकरी आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या
महिला वारकरी यांचे लयबद्ध संचलन, देऊळवाड्यात या वारकऱ्यांनी उभारलेले मनोरे, महिलांच्या फुगड्या आणि फेर आणि टिपेला पोहचलेल्या टाळ-मृदंगांच्या गजरात देहभान हरपून नाचणारे टाळकरी, यामुळे हा सोहळा अधिकच रंगला.
