स्थलांतराच्या वादात सापडलेल्या नारायणगाव दुय्यम निबंधक कार्यालयाचे अखेर स्थलांतर

1 min read

नारायणगाव, दि.१७:- वारूळवाडी (ता. जुन्नर) हद्दीतील दुय्यम निबंधक कार्यालय नारायणगाव हद्दीतील आशीर्वाद इन्फ्रास्ट्रक्चर यांनी नव्याने बांधकाम केलेल्या योगिनी खैरे यांच्या मालकीच्या सुयोग साम्राज्य सुसज्ज इमारतीत स्थलांतर करण्यात आले आहे. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या २५ फेब्रुवारीच्या पत्राचा संदर्भ देत सहाय्यक नोंदणी महानिरीक्षक किशोरकुमार मगर यांनी १६ जून रोजी दिलेल्या पत्रानुसार दुय्यम निबंधक अधिकारी अर्चना पाकळे यांना कार्यालय नवीन जागेत स्थलांतर करण्याचे आदेश प्राप्त झाले होते. आदेश प्राप्त होताच दुय्यम निबंधक अधिकारी यांनी सोमवारी (दि.१६) एका खासगी गाडीत बसून उपस्थित वारुळवाडी ग्रामस्थांना चकवा देत नवीन जागेत स्थलांतरित होत असलेल्या कार्यालयाचे फित कापून उद्घाटन केले.दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतर होत असल्याचे समजताच वारुळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच विनायक भुजबळ, वरूण भुजबळ यासह ग्रामस्थांनी कार्यालयात येऊन ठाण मांडले. आम्ही कार्यालयासाठी ग्रामपंचायत इमारतीत स्वतंत्र जागा देत असताना. दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतर करण्याचा निर्णय का घेण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला. आम्ही कार्यालय स्थलांतरित होऊ देणार नाही असा पवित्रा घेण्यात आला. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी गांभीर्य लक्षात घेऊन वारूळवाडी परिसरातील जुन्या जागेत असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या सभोवताली पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!