विमान अपघातातून बचावलेल्या प्रवाशाने सांगितला थरारक अनुभव;काय पाहिलं विश्वास रमेश यांनी?

1 min read

अहमदाबाद दि.१३:- “विमानानं टेकऑफ घेतल्यानंतर साधारण पुढच्या ३० सेकंदांमध्येच खूप मोठा आवाज यायला लागला आणि विमान कोसळलं. या सगळ्या घडामोडी खूपच वेगाने घडल्या”… अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातामधून चमत्कारिकरीत्या बचावलेले एकमेव प्रवासी विश्वास कुमार रमेश सांगत होते.३९ वर्षीय विश्वास रमेश हे भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असून दीव येथे आपल्या भावासोबत आले होते. त्यांची पत्नी व मुलं लंडनमध्ये राहतात. अहमदाबादहून ते आपल्या भावासोबत परत निघाले होते. एअर इंडियाच्या AI 171 या विमानात 11A या सीटवर ते बसले होते. त्यांच्यासह विमानात एकूण २४२ प्रवासी होते. मेघानीनगर परिसरात विमान कोसळल्यानंतर त्यांच्यापैकी २४१ प्रवासी आणि विमानातील सर्व क्रू मेंबर्स यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातातून फक्त विश्वास रमेश बचावले.दरम्यान, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विश्वास रमेश यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे. “विमानानं टेकऑफ घेतल्यानंतर पुढच्या ३० सेकंदांमध्येच मोठे आवाज यायला लागले आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणांत विमान कोसळलं. मला शुद्ध आली तेव्हा माझ्या आसपास सगळीकडे लोकांचे मृतदेह होते. मी प्रचंड घाबरलो होतो. मी उठून उभा राहिलो आणि धावायला लागलो.तिकडे सगळीकडे विमानाचे जळते तुकडे पसरलेले होते.कुणीतरी मला पकडलं आणि रुग्णवाहिकेत नेलं आणि तिथून रुग्णालयात आणलं”, असं विश्वास रमेश यांनी सांगितलं.गेल्या २० वर्षांपासून रमेश हे लंडनमध्ये त्यांच्या कुटुंबासमवेत राहतात. ते काही दिवसांसाठी त्यांच्या नातेवाईकांना भेटायला भारतात आले होते. त्यांचा मोठा भाऊ अजय कुमार रमेश यांच्यासह ते परत चालले होते. अजय कुमार रमेश हे विमानात वेगळ्या रांगेत बसले होते. “माझा भाऊ माझ्यासोबतच प्रवास करत होता. आम्ही दीवला गेलो होतो. पण आता मला माझा भाऊ सापडत नाहीये”, असंही रमेश यांनी सांगितलं.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!