मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट? चर्चांना उधाण

1 min read

मुंबई दि.११:- उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली असतानाच राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत आज गुरूवारी सकाळी वांद्र्यातील एका हॉटेलमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. वांद्रे येथील ताज लँडस् हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे.आज सकाळी राज ठाकरे ताज लँडस हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर 20 मिनिटांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या हॉटेलमध्ये पोहोचले. सुरुवातीला हे दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये एकत्र येणे योगायोग आहे का, अशी चर्चा सुरु होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या नियोजित कार्यक्रमात कुठेही ताज लँडस हॉटेलचा समावेश नव्हता. मात्र, राज ठाकरे या हॉटेलमध्ये आल्यानंतरच देवेंद्र फडणवीस वाट वाकडी करुन याठिकाणी का पोहोचले, असा सवाल आता विचारला जात आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही भेट निर्णायक ठरणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.गेल्या दोन महिन्यांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. अभिनेते महेश मांजकरे यांनी राज ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी युतीसाठी समोरून टाळी दिली होती. महाराष्ट्राच्या प्रश्नांसमोर आमची भांडणं काहीच नाहीत असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सकारात्मकपणे घेत युतीसाठा हिरवा कंदिल दिला होता. मात्र दोन्ही पक्षांमध्ये युतीला पूरक अशी चर्चा झाली नाही. मात्र आता देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीच्या बातमीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे