स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जुन्नर तालुक्यात जोरदार तयारी

1 min read

जुन्नर दि.११:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने जुन्नर तालुक्यातील सर्वच पक्षाचे नेते तयारीला लागले आहेत. यामध्ये जुन्नर तालुका आघाडीवर असून कार्यकर्त्यांचे मिळावे घेण्याची तयारी जोरदार सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा माजी आमदार अतुल बेनके यांचे निवासस्थानी नुकताच झाला. तसेच भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या उपस्थितीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा ओझर या ठिकाणी पार पडला. सोमवार दि.९ रोजी आमदार शरद सोनवणे यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये जिल्हा परिषद,पंचायत समिती व जुन्नर नगर परिषद या निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांचा कानोसा घेतला गेला. राज्यात महायुती आघाडी असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसने जुन्नर तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय कार्यकर्त्यांचा आहे. भाजपाची यासंदर्भात भूमिका अद्याप समजले नाही. दरम्यान महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सामसूम दिसत आहे. शिवसेनेच्या उबाठा गटाचा मेळावा नारायणगाव येथे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत काही दिवसापूर्वी पार पडला आहे. सर्व पक्षाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या इच्छुक उमेदवारांची यादी मोठी असली तरी पक्ष ज्यांना उमेदवारी देईल. त्यांनाच निवडणुकीला सामोरे जाता येणार असल्याने व पक्ष काय निर्णय घेईल याकडे सर्व उमेदवारांचे लक्ष लागले आहे. उमेदवारांची संख्या पाहता जिल्हा परिषद गटांमध्ये अटीतटीचा सामना होण्याची शक्यता आहे. संभाव्य उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. वाढदिवस, लग्न समारंभ व इतर कार्यक्रमाला संभाव्य उमेदवार हजेरी लावत आहेत. तर एवढे दिवस दडून बसलेले संभाव्य उमेदवार सध्या सामाजिक कार्यामध्ये सुद्धा उतरलेले दिसत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!