शिरोली सुलतानपूर चे विद्यालय ठरले शंभर नंबरी

1 min read

शिरोली दि.२३:- पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे संचलित, इंग्लिश स्कूल शिरोली तर्फे आळे (सुलतानपूर) बोरी या विद्यालयाचा मार्च एस.एस.सी २०२५ चा 100% निकाल लागला असून विशेष प्राविण्य श्रेणी ७ विद्यार्थी, प्रथम श्रेणी १२ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी 4 विद्यार्थी, व उत्तीर्ण श्रेणीमध्ये २ विद्यार्थी चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झालेले आहेत.विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. एम. बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली ह्या शैक्षणिक वर्षात संस्थेच्या मार्गदर्शनाखाली प्रथमताच परिपूर्ण संख्या असलेला 9 शिक्षकांचा स्टाफ उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या शंका समस्या न संकोचता वेळीच निरसन करता आल्या. शिरोली- सुलतानपूर व आजूबाजूच्या परिसरातून वाड्या वस्त्यांवरून हे विद्यार्थी चार ते पाच किलोमीटर अंतरावरून येत आहेत. विशेष म्हणजे कुठेही खाजगी शिकवण्याची सोय नसताना विद्यालयातील शिक्षकांनी शिकवलेल्या व विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानाच्या जोरावर विद्यालयाचा १००% निकाल लागलेला आहे. स्वकष्टातून व संघर्षातून सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे यश विद्यार्थ्यांनी प्राप्त केल्याने या यशाची गोडी आयुष्यभर स्मरणात राहील. असे उद्गार विद्यालयाचे मुख्याध्यापक महेंद्र बोऱ्हाडे यांनी पाचही सावित्रीच्या लेकींचा सन्मान करताना काढले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन च्या उपाध्यक्ष मीनाक्षी दिवेकर, व सदस्या जयश्री खिलारी, तसेच सर्व पालक नीता खिलारी, अर्चना खिलारी, संतोष डावखर, अमन मणियार उपस्थित होते. ज्यांच्या नेतृत्वाखाली या विद्यालयाची स्थापना करण्यात आली ते विद्यालयाचे स्फूर्ती स्थान व प्रमुख मार्गदर्शक व प्रसिद्ध उद्योजक विष्णू डावखर (मुंबई) यांनी सर्व शिक्षक, विद्यार्थी, व मुख्याध्यापकांचे जाहीर अभिनंदन केलेलं आहे. याशिवाय पुणे व मुंबईमधील सर्वच उद्योजकांनी, तसेच गावांमधील दानशूर उद्योजक व सर्व ग्रामस्थांनी, सरपंच प्रिया खिलारी, व सर्व सदस्य मंडळ, सरपंच योगिता आतकरी व सर्व सदस्य मंडळ व शाळा व्यवस्थापन च्या उपाध्यक्ष मीनाक्षी दिवेकर, व सर्व सदस्यांनी विद्यालयाचे ह्या यशाबद्दल कौतुक केले आहे. विद्यालयाला वेळोवेळी संस्थेच्या सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळत असते. संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक बोऱ्हाडे यांचेही भ्रमणध्वरीद्वारे अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे