मुंबई, ठाणेसह कल्याण, डोंबिवली, वसई, विरार परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला

1 min read

मुंबई दि.७:- मुंबई शहरासह उपनगरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. ऐन मे महिन्यात पाऊस कोसळल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या या पावसाचा फटका मुंबई लोकलला बसला आहे.मुंबईतील अवकाळी पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने सुरु आहे. तब्बल 20 ते 25 मिनिटे लोकल सेवा उशिराने सुरु आहे. सीएसएमटीहून ते कर्जतकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाला आहे. मध्य रेल्वेला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोरदार वाऱ्यामुळे ओव्हरहेड वायर्समध्ये समस्या येत असल्याने गाड्या उशिराने धावत आहेत. हार्बर लाईनवर गाड्या ५ ते ७ मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने एक नवीन इशारा जारी केला आहे. पुढील ३ ते ४ तासांमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.यासोबतच गडगडाटी वादळ आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने नागरिकांना बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली आणि दहिसर भागात जोरदार वाऱ्यासह हलक्या सरी कोसळताना दिसत आहे. तसेच सायन, कुर्ला आणि चुनाभट्टी परिसरातही रिमझिम पाऊस पडताना दिसत आहे. ठाण्यातही सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. ऐन मे महिन्यातच पाऊस कोसळल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या राज्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली असल्याने ठाणेकर उकाड्याने हैराण झाले होते. आता या पावसामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे