पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर गृहमंत्री अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर…”

1 min read

नवी दिल्ली दि.७:- जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तब्बल ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या मोहिमेला भारताने ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलंय. दरम्यान, या प्रत्युत्तरानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्स पोस्टवर म्हटलंय की, “आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. ऑपरेशन सिंदूर हे पहलगाममध्ये आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेले प्रत्युत्तर आहे. भारत आणि भारतीयांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला योग्य उत्तर देण्याचा मोदी सरकारचा निर्धार आहे. भारत दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी दृढनिश्चयी आहे.”

पाकिस्तानकडून थयथयाट

भारतानं मध्यरात्री केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्ताननं आता थयथयाट सुरू केला आहे. भारतावर निराधार आरोपांचा कांगावा करण्याबरोबरच पाकिस्तानकडून सीमेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यापासून पाकिस्तानकडून वारंवार सीमेपलीकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करून गोळीबार केला जात होता. आज पहाटे भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केल्यानंतर काही वेळातच पाकिस्ताननं सीमेवर गोळीबार सुरू केला. भारतीय लष्करानंही त्याला चोख प्रत्युत्तर देत तिथेही पाकिस्तानला गप्प केलं!

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे