देशासाठी बलिदान, काश्मीरमध्ये लढताना मुंबईचा जवान शहीद
1 min read
Oplus_131072
मुंबई दि.९:- भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानंतर बोकाळलेल्या पाकिस्तानने सीमारेषेवर गोळीबार सुरू केला आहे. भारतीय सैन्य दलानेही या गोळीबाराला चोख प्रत्त्युत्तर दिलं असून पाकिस्तानी रेंजर्सना तडाखा दिला आहे. सीमारेषेवर तणाव पाहायला मिळत असून चकमक अद्यापही सुरुच आहे.
पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना भारतीय सैन्य दलाचे 2 जवान शहीद झाले आहेत. त्यामध्ये, मुंबईतील रहिवाशी असलेले आणि मूळचे आंध्र प्रदेशचे असलेल्या मुरली नाईक यांना वीरमरण आलं आहे.
भारतीय सैन्याचे दुसरे जवान दिनेश शर्मा यांनाही पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढताना वीरमरण प्राप्त झाले. गोळीबारात जखमी झाल्यानंतर शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
देशासाठी लढता लढता ते शहीद झाले. जम्मू काश्मीरजवळ पाकिस्तानच्या हल्ल्यात घाटकोपरच्या कामराज नगरमधील रहिवासी मुरली श्रीराम नाईक हे जवान शहीद झाले आहेत. मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेले नाईक कुटुंब हे कामराज नगरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होते.
मात्र, काही दिवसांपूर्वी सदरची झोपडपट्टी पुनर्विकासात गेल्याने त्यांची घरे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे, सध्या नाईक यांचे कुटुंब आंध्र प्रदेशाला राहण्यास गेले आहे. मुंबईतील घाटकोपर वार्ड क्रमांक 133 मध्ये मुरली नाईक यांच्या शहीद झाल्याचे बॅनर लावण्यात आले असून त्यांना स्थानिकांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
आज 9 मे रोजी पहाटे 3.00 वाजता झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान मुरली नाईक यांना वीरमरण आल्याचे या बॅनरवरून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्वविट करुन शहीद जवान मुरली नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
नाईक हे सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील रहिवाशी होते. देशासाठी बलिदान देणाऱ्या मुरली नाईक यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, नाईक कुटुंबीयांप्रती सहवेदना आहेत, असे ट्वविट मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केले आहे.