नेमकी वेळ…१ वाजून २८ मिनिटं का? ऑपरेशन सिंदूर नाव का? वाचा सविस्तर 

1 min read

नवी दिल्ली दि.७:- भारतीय हवाई दलानं मध्यरात्रीनंतर म्हणजेच १ वाजून २८ मिनिटांनी दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. पुढच्या २३ मिनिटांत सर्व ९ दहशतवादी तळ भारतीय हवाई दलानं उद्ध्वस्त केले होते. या कारवाईसाठी भारताकडून राफेल विमानांचा वापर केल्याचं सांगितलं जात आहे.

शिवाय, भेदक मारा करणाऱ्या स्काल्प क्षेपणास्त्रांचा वापर ऑपरेशन सिंदूरसाठी करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कारवाईदरम्यान होतं लक्ष दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी या संपूर्ण करावाईवर लक्ष ठेवून होते. मंगळवारी संध्याकाळी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते.

मात्र, कोणत्याही प्रकारे अशा कोणत्या हल्ल्याची तयारी भारत करतोय, हे उघड न होऊ देता भारतानं हा एअर स्ट्राईक केला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा इतर देशांशी संपर्क एअर स्ट्राईक झाल्यानंतर पुढच्या काही वेळातच भारत सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी इतर देशांमधील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी या एअर स्ट्राईकसंदर्भात संपर्क साधला.

त्यांना हल्ल्यासंदर्भात माहिती दिली. यात अमेरिकेचे मार्को रुबियो, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, ब्रिटन अशा देशांचा समावेश आहे. देशभरातून अभिनंदनपर प्रतिक्रिया:- गेल्या काही दिवसांत देशातील सर्वच राजकीय पक्षांनी केंद्र सरकारच्या पाठीशी उभे असल्याचं नमूद केलं होतं. या एअर स्ट्राईकनंतर विरोधी पक्षांतील सदस्यांसह सर्वच राजकीय पक्षांनी भारतीय लष्कराचं अभिनंदन केलं आहे.

तसेच, भारतीय लष्कराचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यात विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे.

पीडितांच्या कुटुंबीयांच्या भावनिक प्रतिक्रिया

पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या २६ भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांनी भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकनंतर भावनिक प्रतिक्रिया देत आपल्याला न्याय मिळाल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रातील मृत नागरिकांच्या कुटुंबीयांनीदेखील ऑपरेशन सिंदूरबाबत समाधान व्यक्त केलं आहे.

ऑपरेशन सिंदूर नाव का?

दरम्यान, या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असंच नाव का दिलं? अशी चर्चा सुरू असताना पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनी त्यासंदर्भात प्रतिक्रिया दिल्या आहेत. या हल्ल्यात घरातल्या कर्त्या पुरुषांना दहशतवाद्यांनी लक्ष्य करत महिलांचं कुंकू पुसलं होतं. त्यामुळेच या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं म्हटलं गेलं.

डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या एअर स्ट्राईकसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता मोठं काहीतरी घडणार असं वाटतच होतं. भारत व पाकिस्तान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष चालूच होता. मी आशा करतो, की आता हे सगळं लवकर संपेल”, अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे