उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यावर फेकला चुना; पीकविम्यावरील वक्तव्याचा निषेध

1 min read

परभणी दि.२८:- ‘एक रुपयात पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला’ या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करीत महाराष्ट्र राज्य किसान सभा, युवक काँग्रेस आणि भाकपच्या कार्यकत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी जाताना त्यांच्या ताफ्यावर चुना फेकल्याची घटना शनिवारी घडली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक रुपयात पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांत तीव्र संताप निर्माण झाला आहे. पवार यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी व पीक विमा घोटाळ्यात सहभागींवर कायदेशीर कारवाई करावी. या मागणीसाठी चुना फेक आंदोलन करण्यात आले. पोखर्णी नृसिंह येथे दर्शन घेऊन उपमुख्यमंत्री पवार जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसाठी येत होते. तेव्हा आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर त्यांच्या ताफ्यासमोर चुन्याच्या डब्या फेकल्या. पोलिसांनी हस्तक्षेप करीत युवक काँग्रेसचे अमोल जाधव, किसान सभेचे शिवाजी कदम, काँग्रेसचे रोहिदास बोबडे, सीपीआयचे शेख अब्दुल, स्वराज्य इंडियाचे गोविंद गिरी, यांना ताब्यात घेतले.सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, सोयाबीनला ६ हजार रुपये भाव देण्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनीच महाराष्ट्राच्या मतदारांना चुना लावला आहे. वास्तविक पाहता पीक विमा कंपन्यांनी मागील पाच वर्षांत ५० हजार कोटी रुपयांची कमाई केली. महाराष्ट्रात दररोज पाच ते सहा शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अर्थ मंत्रालयाने सामाजिक न्याय विभागाचा निधी कपात करून राज्यातील मागासवर्गीय समुदायाला चुना लावला आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे