दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई अलर्टवर; सुरक्षा वाढवली
1 min read
मुंबई दि.२८:- पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डर बंद करण्यात आली आहे. तिथले चेक-पोस्ट बंद करण्यात आले आहेत. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने भारताला धमकी दिली जात आहे. तिथल्या मंत्र्यांकडून प्रक्षोभक वक्तव्ये केली जात आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईत अलर्ट जारी करण्यात आला आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.दहशतवाद हल्ल्याच्या घटनांचा इतिहास पाहिला तर मुंबईचं या हल्ल्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे.
मुंबईत एकेकाळी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते. तसेच त्यानंतर 26/11 चा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या जखमा कधीही भरुन निघणार नाहीत,अशा आहेत.पहलगाम येथील हल्ल्यानंतर अतिरेक्यांकडून पुन्हा मुंबईवर लक्ष्य केलं जाऊ शकतं.
कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे कोट्यवधी नागरीक राहतात. याआधीच्या हल्ल्यात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर (सीएमएमटी) येऊन दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता.
त्यामुळे अशा घटनेची पुनरावृत्ती घडू नये यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. पहलगाम येथील हल्ल्यानंतर आता मुंबईतदेखील अलर्ट जारी करण्यात आलं आहे. वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आणि आरपीएफ यांच्याकडून पाहणी केली जाणार आहे.
खबरदारी म्हणून सीएसएमटी स्थानकाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आरपीएफ, जीआरपी, एमएसएफ, डॉग स्क्वॉडकडून संयुक्त गस्तीला सुरुवात झाली आहे. मुंबईत पोलीस हाय अलर्टवर आहेत. तसेच सर्वच ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली जात आहे.