साळवाडीत यमुनाबाई काळे यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा
1 min read
बोरी खुर्द दि.२४:- जुन्नर तालुक्यातील बोरी खुर्द (साळवाडी) या गावात यमुनाबाई बाबुराव काळे यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त नुकताच त्यांच्या कुटुंबीयांनी सहस्रचंद्रदर्शन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला.आजी आजही घरातील लहान सहान कामे करून नात सून मंगल काळे यांना मदत करतात. त्यांचा महत्त्वाचा छंद म्हणजे कधी एका जागी न राहता प्रत्येक नातेवाईकांच्या गाठीभेटी घेणे हा आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने काळे कुटुंबीयांनी ह. भ. प. स्वप्निल महाराज दातखिळे (जुन्नर) यांचा प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमामागील महत्त्वाचे कारण म्हणजे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट व मित्रपरिवार एकत्र यावा. प्रवचन झाल्यानंतर आजीचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा व अभिष्टचिंतन कार्यक्रम पार पडला. यामध्ये १०० दिवे लावून पाच मानाच्या नातेवाईक सुवासिनींच्या हस्ते ओवाळणी व औक्षण करण्यात आले.
त्यानंतर आजींच्या हस्ते केक कापण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी गावचे उपसरपंच महेश काळे तसेच तंटामुक्ती अध्यक्ष रामदास काळे व इतर ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा व दीर्घायुष्य लाभावे अशा अपेक्षा व्यक्त केल्या. गावच्या सरपंच कल्पना काळे यांच्या वतीने वैभव काळे यांनी आजींची भेट घेऊन अभिष्टचिंतनपर शुभेच्छा दिल्या.
सामाजिक कार्यकर्ते धोंडीभाऊ मुटके यांनी आजींना दीर्घायुष्य लाभावे अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजीच्या जवळचा नातेवाईक मोठ्या बहिणींचा मुलगा व बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी रामकृष्ण पाचपुते यांनी शुभेच्छा व भावना व्यक्त केल्या.
आजीची नात प्रियंका भोसले यांनी स्वतः तयार केलेली सुंदर अशी कविता सर्वांसमोर सादर केली. आजीच्या नातवाची मुलगी वैष्णवी काळे आणि नातीची मुलगी सानवी मुटके या दोघींनी एकत्र अशी तयार केलेली कविता सादर केली.
शेवटी स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जमलेल्या सर्व मान्यवरांच्या आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आजींचे भाचे डॉ. सत्यवान थोरात यांनी केले. अशा प्रकारचा कार्यक्रम आजीच्या डोळ्यासमोर झालेला पाहून आजींनाही खूप समाधान वाटले
व जगण्याची उमेद व आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली व अशा प्रकारचे कार्यक्रम समाजात वेळोवेळी साजरे व्हावेत ही इच्छा त्यांनी व्यक्त केली. आजींना तीन मुले व चार मुली तसेच नातू पणतू असे भरलेले घर पाहून खूप आनंदी जीवन जगतात.
या वयातही आजींची प्रकृती ठणठणीत आहे.अशा प्रकारे काळे कुटुंबीयांनी सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा केल्यामुळे परिसरात या कुटुंबीयांचे कौतुक होत आहे.