नागपुरात कंपनीत भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू; ११ जण गंभीर जखमी
1 min read
नागपूर दि.१२:- नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसीमधील अॅल्युमिनियम पावडर आणि अॅल्युमिनियम फॉइल तयार करणाऱ्या कंपनीत स्फोट झाला आहे.
या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. स्फोट झालेल्या कंपनी परिसरात तीन मृतदेह आढळून आले आहेत.
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तीन जणांपैकी दोन जणांचा आज मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. उमरेडचे आमदार संजय मेश्राम यांनी यासंदर्भातील माहिती दिली. अद्याप स्फोटाचं कारण कळू शकलेलं नाही. तरी यासंदर्भातील तपास सुरू आहे.
नागुपरातील उमरेड एमआयडीसीत एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत अल्युमिनियम फॉइल आणि पावडर तयार केली जाते. या कंपनीत शुक्रवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे काम सुरू होते. १५० कामगार काम करत होते. संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास जोरदार स्फोट झाला. या स्फोटानंतर भीषण आग लागली.
स्फोटामुळे येथे काम करणाऱ्या काही कामगारांचे कपडे अंगावरच जळाले.स्फोटानंतर कामगारांनी बाहेर धाव घेतली. आपला जीव मुठीत घेऊन बाहेर पळत सुटले. यामुळे अनेक कामगार थोडक्यात बचावले. पण काही जण अडकले. त्यात अकरा जण जखमी झाले.
दरम्यान या स्फोटामुळे कंपनीच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कामगारांच्या मनात प्रचंड दहशत पसरली आहे. आता स्फोटाचे कारण शोधण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाने तपास सुरू केला आहे.
नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. स्फोट होऊन लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. यामध्ये 11 कामगार गंभीर जखमी झाले. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर नागपूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.