जुन्नरमध्ये पिकतोय सफरचंद; अर्धा एकरात फुलवली सफरचंदाची बाग

पिंपरी पेंढार (ता.जुन्नर) येथील युवा शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत अर्धा एकरात सफरचंद लागवड केली आहे. सध्या या झाडांना सफरचंद लगडली आहेत. त्यातून चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.
त्यांनी आपल्या शेतात पारंपरिक पद्धतीने सुमारे अर्धा एकरवर ‘हरमन ९९’ या जातीच्या १५० सफरचंदाच्या रोपांची लागवड डिसेंबर २०१९ मध्ये केली. त्यासाठी काश्मीरहून रोपे मागविली.
शेणखत, रासायनिक खत या रोपांना देण्यात आले. सध्या या फळबागेत चांगली सफरचंद लगडली असून, महिन्याभरात बाजारामध्ये विक्रीस येणार असल्याचे प्रणय आणि तुषार यांनी सांगितले. यामधून चांगले उत्पादन होईल, अशी त्यांची अपेक्षा आहे.
जाधव हे पारंपरिक शेतीबरोबर गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ द्राक्ष उत्पादन घेत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शेतमालाला मिळणारा अनिश्चित दर यामुळे त्यांची दोन्ही पदवी व पदवीधर शिक्षण घेतलेली मुले प्रणय जाधव (एम. कॉम.) व तुषार जाधव (बी. कॉम.) यांनी नोकरी, व्यवसायाच्या मागे न लागता शेतातच नाविन्यपूर्ण प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या जवळच्या काळवाडी येथील नातेवाईकांकडे सफरचंदाची झाडे बघितली आणि आपल्याही शेतात हा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला.